नाशिक: दिवंगत माजी मंत्री अर्जुन पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांचे चिरंजीव ऋषिकेश आणि उर्वी यांचा विवाह सोहळा काल मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. मात्र या विवाह सोहळ्याची चर्चा होण्याच कारण काय ? तर ते कारण म्हणजे नवरदेवाचे वडील आणि काकू. नवरदेवाचे वडील आणि त्याच्या काकू वेगवेगळ्या राजकीय पक्षात असल्यामुळे या लग्नाकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष होते.
वर ऋषिकेश आणि वधू उर्वी या दोघांचाही राजकीय वारसा आहे. ऋषिकेश यांचे आजोबा अर्जुन पवार ( ए. टी ) सलग सात वेळा आमदार झाले आहेत. त्यांनी राज्याचे मंत्रिपदही भूषवले होते. नवरदेवाचे वडील राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार आहेत. तर त्यांच्या काकू म्हणजे डॉक्टर भारती पवार या केंद्रात राज्यमंत्री आहेत. ऋषिकेश यांच्या आई देखील नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत. ऋषिकेश यांची अशी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. यावरून तर या लग्नाकडे जिल्ह्याचे लक्ष का लागले असावे याचे चित्र स्पष्ट आहे. एका कुटुंबातील सदस्य दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये. एक राष्ट्रवादीत तर एक सदस्य भाजपमध्ये, अशात राजकीय मतभेदामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या लग्नाला उपस्थित राहतात की नाही याबाबत चर्चा रंगली होती.
वधू उर्वी यांच्या कुटुंबाची देखील राजकीय पार्श्वभूमी आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी यांच्या त्या पुतणी आहेत. यशवंत गवळी यांनी कळवण तालुक्यातील अभोना गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. नाशिकमध्ये गंगापूर रोडवरील एका लॉन्समध्ये हा विवाह सोहळा झाला. या विवाह सोहळ्याला माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, दत्ता भारणे माणिकराव कोकाटे , संग्राम जगताप ,दिलीप बनकर, आदिती तटकरे , किरण लहामगटे, नरेंद्र दराडे यांनी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी विशेष उपस्थिती लावली होती.
भाजपच्या खासदार भारती पवार ऋषिकेश यांच्या काकू आहे. गेल्या निवडणुकीत भारती पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण झाले होते. राजकीय मतभेदामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या लग्नाला उपस्थित राहतात की नाही याबाबत चर्चा रंगली होती. परंतु भारती पवार यांनी लग्नाला उपस्थिती लावली. आमदार नितीन पवार यांच्या कुटुंबीयांनी भारती पवार यांच्या घरी जाऊन लग्नासाठी आमंत्रण दिल्याने त्या उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान कुटुंबातील राजकीय माताभेतामुळे या लग्नाची चर्चा मात्र जिल्ह्भारात रंगली.