संभाजी भिडेंना वक्तव्य भोवले! राज्यभर उमटताय पडसाद

मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला केलेले वादग्रस्त वक्तव्य त्यांना चांगलेच भोवणार असे दिसत आहेत. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटत असून अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलने केली जात आहेत. त्यात पुण्यात महिला काँग्रेसने आक्रमक होत आंदोलन करत महिला कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या पोस्टरला टिकली लावून महिला कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचा निषेध नोंदवला आहे. राज्यभर आता त्यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला जात असून त्यांना महिला आयोगाने नोटीस देखील पाठवली आहे.

काय आहे प्रकरण?

बुधवारी संध्याकाळी संभाजी भिडे हे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर भिडे गुरुजी बाहेर पडले. यावेळी एका महिल पत्रकाराने त्यांना भेटीत काय झाले, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी आधी तू कुंकू लावून ये, मग मी तुझ्याशी बोलतो, असे वक्तव्य भिडे यांनी केले होते.

प्रत्येक महिला ही भारतमातेचं रुप आहे. भारतमाता विधवा नाही, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. यावरून महिला वर्गातून संताप व्यक्त होतोय.

यानंतर अनेकांनी त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत निषेध नोंदवला,

आमदार अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडेंविरोधात आज प्रतिक्रिया दिली. भिडे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

अमृता फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही काल यावर प्रतिक्रिया दिली. संभाजी भिडे यांचा आदर आहे, मात्र महिलांनी काय करावे, काय करू नये, हे त्यांनी सांगू नये, असा टोमणा त्यांनी मारला.

महिला आयोगाचे नोटीस

महिला आयोगामार्फतही संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सदर वक्तव्यानंतर भिडे यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, असे नोटीशीत म्हटले आहे.