By चैतन्य गायकवाड |
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशभरात राज्यसभेच्या (Rajyasabha) ५७ जागांसाठी जागांसाठी चुरस सुरु होती. त्यातल्या बहुतांश जागा बिनविरोध निवडून गेल्या. पण काही जागांवर मात्र निवडणूक लागली होती. अश्यातच महाराष्ट्रातल्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक झाली. काल या ६ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यात सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे (Shivsena) संजय पवार आणि भाजपाचे (BJP) धनंजय महाडिक या दोन कोल्हापूरच्या उमेदवारांमध्ये रंगत होती. दरम्यान, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मते फुटल्याची शक्यता असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. या अपक्ष आमदारांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.
आज सकाळी मुंबईत संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी (Media) संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीला दगा दिला असल्याचे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले की, अपक्ष आमदारांनी आम्हाला शब्द देऊनही मतदान केले नाही. सहा सात मते आम्हाला मिळाली नाही. ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला होता तो पाळला असता, तर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला नसता. असे म्हणतानाच संजय राऊत यांनी थेट ‘त्या’ अपक्ष आमदारांची (Independent MLAs) नावेच जाहीरपणे सांगितली.
त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवरदेखील टीका केली आहे. मते मिळवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि निवडणूक आयोगाचाही (Election Commission) वापर केला जातो का अशी शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. “पहिल्या फेरीत आमच्या संजय पवारांना ३३ मते मिळाली आहे. तर धनंजय महाडिक यांना पहिल्या फेरीत २७ मते मिळाली आहे. हादेखील आमचा विजय आहे.” असंही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीची ९ मते फुटली असल्याची शक्यता समोर आली आहे. यामुळे भाजपाचे धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत, काँग्रेसचे (Congress) इमरान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे (NCP) प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे हे पहिल्या फेरीतच विजयी झाले आहे. मात्र महाविकास आघाडीची ९ मते फुटल्याच्या शक्यतेने सहाव्या जागवरचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.