By चैतन्य गायकवाड
नाशिक : शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटात शिवसेनेचे जवळपास 40 आमदार सामील झाल्याने, आता शिवसेना पक्ष बांधणीसाठी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील दादा भुसे (Dada Bhuse) आणि सुहास कांदे (Suhas Kande) हे दोन आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना, आपले मत व्यक्त केले. त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका करताना, त्यांना भोंग्याची उपमा दिली.
भारतीय जनता पक्षाला नवे भोंगे मिळाले
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावरचे बोलणं थांबवले आहे. त्यांना आता ४० नवे भोंगे मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाला शिवसेना फोडायची नाही, तर शिवसेना संपवायची आहे. त्याशिवाय त्यांचे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही.” त्यामुळे शिवसेना संपवण्याचा हा डाव आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर
राज्यात अस्तित्वात आलेले नवे सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने, बहुमत सिद्ध करायला लावणे हे बेकायदेशीर आहे. राज्यपाल हे घटनेचे पालन करणारे नाही, असे सर्वांचे म्हणणे आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले.
फूट पाडणे हे भाजपचे धोरण
शिवसैनिकांमध्ये फूट पाडणे, तसेच शिवसैनिकांना एकमेकांवर हल्ले करायला लावणे, हे भाजपचे धोरण आहे. दिल्लीच्या पाठिंब्याने हे सर्व सुरू आहे, असा गंभीर आरोप देखील राऊत यांनी केला. तसेच भाजपच्या या धोरणामुळे आम्ही सावधपणे पावले टाकत आहोत, असे देखील राऊत म्हणाले.
नाशिक मनपावर शिवसेनेचा भगवा
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी, येणाऱ्या निवडणुकीत नाशिक महापालिकेवर (Nashik Municipal Corporation) शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. नाशिक मनपातील सर्व माजी नगरसेवक हे शिवसेनेसोबत आहे. राज्यातील वातावरण हळूहळू शांत होईल. शिवसेना नव्या जिद्दीने कामाला लागली आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.