‘ही आहे आमदारांची भावना’.. संजय शिरसाठ यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..

By चैतन्य गायकवाड |

काल मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (facebook live) भावनिक आवाहन करून बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्याला वेळ देत नसल्याची, या बंडखोर आमदारांची भूमिका आहे. तशी नाराजी त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. या पत्रातून संजय शिरसाट यांनी आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला आहे. संजय शिरसाठ यांचे तीन पानी पत्र व्हायरल झाले आहे.

काय आहे पत्रात… काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होती. त्याचा निकाल काय लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.” असे संजय शिरसाट यांनी पत्रात म्हटले आहे.

संजय शिरसाठ यांचे पत्र…

“शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात, पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही, कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही. मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. वटव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.” असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी म्हटले की, “तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे? हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही. किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती, मतदारसंघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान.. आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.