एटीएम फोडणारी परराज्य टोळी जेरबंद; सातपूर पोलिसांची कामगिरी

नाशिक: एटीएममध्ये (ATM) छेडछाड करून वेगवेगळ्या बँकांची फसवणूक करणारी परराज्य टोळी जेरबंद करण्यात आली आहे. सातपूर पोलिसांनी (Satpur police) ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. या टोळीतील ४ संशयित आरोपींना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातपूर येथील अशोक नगर परिसरातील युनियन बँकचे (Union bank) एटीएम आहे. या एटीएममध्ये काम पाहणाऱ्या संबंधित कंपनीकडून पोलिसांना संदेश प्राप्त झाला की, त्यांच्या बँकेच्या एटीएम मशीनला अनोळखी व्यक्ती छेडछाड करीत आहे. हा संदेश प्राप्त झाल्याने तात्काळ सातपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. या पथकाला सातपूर येथील पपया नर्सरीजवळ असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या (Bank of Maharashtra) एटीएममध्ये दोन व्यक्ती संशयितरित्या हालचाल करताना मिळून आले. एक व्यक्ती एटीएममध्ये होता व एक बाहेर होता. या दोघांचा संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक वाघ व त्यांच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता, हे दोघेही हिंदी भाषिक असल्याचे लक्षात आले. तसेच या ठिकाणी येण्याचे समाधानकारक कारण देखील त्यांनी सांगितले नाही.

दरम्यान, ही टोळी एटीएममध्ये जाऊन पैसे काढून, लगेच एटीएम मशीनची स्क्रीन असलेला डिस्प्ले जोरात ओढतात आणि एटीएमचे नुकसान करून आतील बाजूस असलेले एटीएम मशीन चालू बंद करतात. दरम्यान, ही टोळी एटीएममधून पैसे काढून देखील पैसे न मिळाल्याबाबत संबंधित बँकेत ऑनलाईन तक्रार दाखल करतात आणि बँकेकडून पैसे वसूल करून घेतात. अशी संबंधित बँकेची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर पोलिसांनी या गुन्ह्यात एकूण चार संशयित आरोपींना अटक केले असून, या संशयित आरोपींकडून वेगवेगळ्या बँकांचे एकूण ५६ एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे. तसेच या संशयित आरोपींनी बऱ्याच वेळा बँकांना फसवणूक केल्याची माहिती प्राप्त झाली असून, बँकांकडून लेखी माहिती प्राप्त करून पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरे (API Nagare), पोलीस हवालदार (Police Constable Bhamare) भामरे, पोलीस नाईक खरपडे (Police Naik Kharpade) हे करीत आहे.