By चैतन्य गायकवाड।
दिंडोरी : बिबट्याच्या (leopard) हल्ल्यात शाळकरी मुलगा (school boy) ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिंडोरी (Dindori) तालुक्यातील निळवंडे (Nilvande) गावातील ही दुर्दैवी घटना आहे. मच्छिंद्र गवारी (वय १०) असे बिबट्याने हल्ला केलेल्या मुलाचे नाव आहे. मच्छिंद्र हा शाळेतून घरी जात असताना, बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.
दरम्यान, या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मच्छिंद्र आणि त्याचे चार पाच मित्र हे शाळेतून घरी जात होते. मात्र, मच्छिंद्र हा चालताना थोडा मागे राहिला. अचानक तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्याला ओढून फरफटत नेले. ही घटना पाहून त्याच्या मित्रांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. आवाज ऐकून गावकरी तिथे जमा झाले. परंतु बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमा झाल्याने दुर्दैवाने मच्छिंद्रला आपला जीव गमावावा लागला. दरम्यान, गंभीर जखमी मच्छिंद्रला ग्रामीण रुग्णालय, दिंडोरी येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, बिबट्याचा या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून दिंडोरी परिसरात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढलेला दिसत आहे. जंगली प्राण्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडत असतात. मात्र, बिबट्याचा या हल्ल्यात एका चिमुकल्या शाळकरी मुलाचा जीव गेल्याने, शाळकरी मुलांमध्ये तसेच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.