नाशिक । प्रतिनिधी
काही दिवसांच्या कालावधीनंतर अखेर नाशिक मनपा हद्दीतील शाळांची घंटा आजपासून वाजली. यावेळी अनेक ठिकाणी विद्यार्थांचा सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला तर अनेक ठिकाणी पालकांमध्ये उदासीनता दिसून आली.
कोरोना नियमांचं पालन करून अखेर आजपासून शाळा सुरु झाल्या. ग्रामीण भागात पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झाले तर शहरात पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. नाशिक मनपा हद्दीत पहिली ते सातवी च्या एकूण ५०४ शाळा असून या शाळांमध्ये एक लाख ८५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. आजपासून शाळा सुरू झाल्या मात्र पालक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याने अनेक विद्यार्थी शाळेला आले नाहीत. हळू हळू शाळा नियमित सुरु झाल्यानंतर पालकांची संमती मिळणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
दरम्यान काही शाळांमध्ये अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सकाळी पालक आपल्या पाल्यांना घेऊन शाळेत आले होते. काही ठिकाणी ढोल ताश्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, तर काही ठिकाणी फुगे, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, शाळांमध्ये विद्यार्थांना कोरोना नियमांचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या नियमांचे पालन विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना करावे लागणार आहे.
नाशिक मनपा हद्दीतील आणि ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांचा आज श्रीगणेशा झाला. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांची लगबग दिसून आली, तर शाळा प्रशासनाकडूनही विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येत होती.