मुंबई : सध्या राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. राज्यात मोठा सत्तासंघर्ष होवून शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. दरम्यान अशा विविध घडामोडींनंतर राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होईल ? आणि त्यात कोणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
अशातच एका राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे. राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. याचा फायदा घेत चार जणांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 3 आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर आरोपींनी आधी आमदारांना फोन करून आपण दिल्लीहून आल्याचे सांगितले.
तसेच मोठ्या मंत्र्यांनी त्यांचा बायोडेटा विचारला आहे, असेही सांगितले. यानंतर संबंधित आरोपींनी आमदारांशी दोन ते तीन वेळा फोनवर बोलून सांगितले की, मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील, सुत्रांच्या माहितीनुसार, हे आरोपी एका बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याचे समजते. फोनवरील संभाषणानंतर 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांची ओबेरॉय हॉटेलमध्ये भेट घेतली.
मंत्रिमंडळात स्थान हवे असेल तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील, त्यापैकी 20 टक्के रक्कम आता द्यावी लागेल आणि उर्वरित मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर द्यावी लागेल, असे बैठकीत सांगण्यात आले. आरोपींनी सोमवारी आमदारांना नरिमन पॉइंटवर भेटण्यासाठी बोलावले, त्यानंतर आमदारांनी त्यांना पैसे घेण्यासाठी ओबेरॉय हॉटेलमध्ये नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना याची माहिती मिळाली, त्यानंतर गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने सापळा रचून एका आरोपीला पकडले आणि त्याच्या चौकशीत आणखी 3 आरोपींची नावे समोर आली, ज्यांना नंतर अटक करण्यात आली.
एका आमदाराच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख ( वय 41, रा. कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी ( वय 57, रा. पाचपाखाडी- ठाणे), सागर विकास संगवई ( वय 37, रा. पोखरण रस्ता- ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी ( वय 53, रा. नागपाडा मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपीने अशा पद्धीतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का ? याबाबत पोलीस तपास करत आहेत.