By चैतन्य गायकवाड
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर काल अखेर पडदा पडला. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची (Eknath Shinde as CM) आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची (Devendra Fadanvis as DCM) शपथ घेतली. त्यानंतर राज्यपाल यांनी शिंदे सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यानंतर मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. पण बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदार मुंबईत कधी परतणार, याविषयी उत्सुकता लागून आहे.
एकनाथ शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीवरून (Guwahati) गोव्याला (Goa) आले होते. त्यानंतर हे आमदार शनिवारी म्हणजेच दोन जुलै रोजी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार अगोदर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन दोन आणि तीन जुलै रोजी होणार होते. आता हे अधिवेशन तीन आणि चार जुलै रोजी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे शिवसेनेचे तसेच काही अपक्ष आमदार हे राज्यात कधी येणार याबाबत, राज्यातील सर्व जनतेला उत्सुकता लागून होती.
काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, रात्री उशिरा एकनाथ शिंदे हे गोव्याला रवाना झाले होते. त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांची बैठक घेतली. आता एकनाथ शिंदे हे पुन्हा मुंबईकडे रवाना झाले आहे. राज्यात २० जून रोजी विधान परिषद निवडणुका (Legislative Council Election) झाल्यानंतर शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हे बंड करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम सुरत (Surat) गाठले. त्यानंतर ते गुवाहाटीला रवाना झाले. त्यांच्या गटातील आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास ३९ तसेच काही अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. राज्यपालांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर, हे सर्व आमदार गोवा येथे आले होते. त्यानंतर ते शनिवारी दोन जुलै रोजी मुंबई दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सुरत, गुवाहाटी आणि गोव्यानंतर आता सर्व बंडखोर आमदार मुंबई दाखल होणार आहे.