शिंदेंनी ठाकरेंना दिलेल्या शुभेछांत ‘पक्षप्रमुख’ असा उल्लेख टाळला

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मात्र सध्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्ताने दिलेल्या शुभेछांचीच जास्त चर्चा आहे. याला कारणही तसच आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नाही तर माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख राहिले नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या अशा शुभेच्छांमुळे बंडखोरांसाठी उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर हे सर्व आमदार कधी आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा करतात. तर कधी आम्ही म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा दावा करतात. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात शिवसेना कोणाची याबाबत रस्सीखेच सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नाही तर माजी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या उल्लेखाने वेगवेगळ्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यात घडलेल्या सत्तानाट्याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. शिवसेनेत बंडखोरी झाली. सुरुवातीला एकनाथ शिंदे नॉटरिचेबल झाले. त्यानंतर शिंदे गटात एकेक करत शिवसेनेचे आमदार सामील होत गेले आणि शिवसेनेला गळती लागली. चाळीस आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि नवे सरकार स्थापन होत शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. ही सर्व राजकीय उलथापालत झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पहिला वाढदिवस होता. अशात या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुखांना एकनाथ शिंदे सह सर्वच बंडखोर आमदार कशाप्रकारे शुभेच्छा देतात, त्यांचा काय उल्लेख करतात याची उत्सुकता होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये शिंदे लिहितात, ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना’. यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नाही तर माझी मुख्यमंत्री म्हणून केलेला उल्लेख आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय.