मनावर दगड ठेवून शिंदेना मुख्यमंत्री केल; दादांच खळबळजनक वक्तव्य

राज्याचे राजकारण अधीच तापलेले असतानाच आता भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत एक खळबळजनक वक्तव्य केल आहे. ‘काळजावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे न्यायचा होता, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. त्यामुळे आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पाटील यांनी हे वक्तव्य केल त्या भाषणाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला होता मात्र, हा व्हिडिओ काही वेळातच फेसबुकवरून डिलीट करण्यात आला आहे.

आपल्याला सत्तेचा मोह नाही, मुख्यमंत्री पद हातात असून मोठ्या मानाने मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना दिले. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले अश्याप्रकारचे मोठेपणाचे वक्तव्य भाजप नेत्यांकडून सत्तास्थापनेच्या वेळी करण्यात येत होती. पण आता चंद्रकांत पाटलांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.

पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असून या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरम्यान, या विधानाने आता भाजपमधील खदखद समोर येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आमदारांनी बंड केले. तर 10 अपक्षांनी शिंदे यांना साथ दिल्याने 50 आमदारांनी एकत्र येवून भाजपच्या सोबत जाऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तेव्हा सर्वानाच वाटले होते की आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ऐनवेळी घोषणा केली की राज्याच्या मुख्यमंत्र्यांची धुरा ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही सोपवत आहोत. आणि केंद्रीय नेतृत्वाच्या दबावाखाली फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीदाची शपथ घ्यावी लागली. त्यामुळे राज्यात शिंदे – फडणवीस सरकारची स्थापना झाली. या निर्णयानंतर भाजपमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. पण आता चंद्रकांत पाटलांनी त्यांची नाराजी पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत उघडपणे मांडली आहे.

ते म्हणाले, राज्यातले सरकार पडल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या वेळी केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले आहेत. आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे, असंही पाटील यावेळी म्हणाले.

हे सर्व वक्तव्य केलेल्या भाषणाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला होता मात्र , हा व्हिडिओ काही वेळातच फेसबुकवरून डिलीट करण्यात आला आहे. या व्हिडिओने मात्र , राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे . तर भाजपमधील खदखद यानिमित्ताने बाहेर पडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे