शिवसेना झाली आता राष्ट्रवादी टार्गेट; रोहित पवारांचा आरोप

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. शिवसेनेनंतर आम्हीच त्याचं टार्गेट असून शिवसेनेत जसे दोन गट पाडले, त्याप्रकारे पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. रोहित पवारांनी अजित पवार यांच्यासोबत असलेल्या संबंधावर देखील खुलासा केला आहे.

रोहित पवार आणि अजित पवार यांच्या संबंधावर काही खुलासे

रोहित पवार यांना त्यांच्या अजित पवार यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल विचारण्यात आले. तुम्हा दोघांमध्ये तणाव आहे का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना पवार म्हणाले, “मला जिल्हा परिषद निवडणुकीत पहिले तिकीट अजित पवार यांनी दिले. मला आमदारकीचे तिकीटही त्यांनी दिले. एवढेच काय माझे लग्नही अजित पवारांनीच जमवले आहे. तुम्हाला जेव्हा प्रगती करायची असते, तेव्हा कुटुंबात तुम्ही स्पर्धा करू शकत नाही. आमचे ध्येय वेगळे आहे.

शिवसेनेनंतर आम्हीच टार्गेट

सुप्रिया सुळे या खासदार आहेत. तर, अजित पवार हे राज्यात लक्ष घालतात. सध्या मी जिथे आहे, त्यावर अधिक लक्ष देण्याचा माझा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, आमच्या घराण्यात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पवार घराण्यात वर्चस्वाची लढाई झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसही फुटेल, असं विरोधकांना वाटते. शिवसेनेनंतर विरोधकांचे पुढचे टार्गेट आम्ही असू शकतो, असे भाकीत त्यांनी वर्तविले.

रोहित पवार यांच्या या दाव्यामुळे आता चर्चाना उधान आले असून खरच राष्ट्रवादीत बंड होऊन राष्ट्रवादीचे दोन गट पडणार का याचे तर्क-वितर्क निघत आहेत.