‘शिवसेना मविआतून बाहेर पडायला तयार; पण,’ – संजय राऊत..

By चैतन्य गायकवाड |

मुंबई : शिवसेना (Shivsena) महाविकास आघाडी सरकारमधून (MVA government) बाहेर पडायला तयार आहे, असे मोठे विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केले आहे. पण, त्यासाठी बंडखोर आमदारांनी २४ तासांत इथे येऊन आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. आज मुबईत शिंदे गटाच्या तावडीतून सुटून आलेले शिवसेना आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) आणि नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी संजय राऊत हे बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. आज वर्षावर शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांची बैठक झाली. या बैठकीत १५ आमदार उपस्थित होते. तर ३ आमदार हे त्यांच्या मतदारसंघातून बैठकीला होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत (CM Uddhav Thackeray) आता १८ आमदार सोबत आहेत.” तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले २१ आमदार आमच्यासोबत येतील, असा दावा देखील संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच उद्या विधानसभेत अविश्वास ठराव मांडल्यास बहुमत सिद्ध करणार, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, “त्या बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं. त्यांची जी मागणी आहे, ती अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांसमोर मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार होईल. पण त्यांनी आधी इथे येण्याची हिम्मत दाखवावी. तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण पक्के शिवसैनिक आहात, आपण शिवसेना सोडणार नसल्याचं सांगताहेत. आमची भूमिका सध्याच्या सरकारबाबत आहे. त्या महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. पण, तुम्ही इथे येण्याची हिम्मत दाखवा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर या आणि भूमिका मांडा. नक्कीच तुमच्या भूमिकेचा विचार होईल.” असंही संजय राऊत यांनी पुढे सांगितलं. तसेच संजय राऊत यांनी आमदारांना २४ तासांत परत येण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, काल मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे (facebook live) भावनिक आवाहन करून बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्याला वेळ देत नसल्याची, या बंडखोर आमदारांची भूमिका आहे. तशी नाराजी त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे. या पत्रातून संजय शिरसाट यांनी आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला आहे. संजय शिरसाठ यांचे तीन पानी पत्र व्हायरल झाले आहे.