या कारणामुळे बंडखोर आमदारांवर होऊ शकते अपात्रतेची कारवाई

मुंबई: उद्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक (election of legislative assembly speaker) होणार आहे. भाजपने शिवसेनेला आणखी एक धक्का देत अगोदर शिवसेनेत असलेले आणि सध्या मुंबईतील कुलाबाचे भाजप आमदार राहुल नार्वेकर (MLA Rahul Narvekar) यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीने देखील या निवडणुकीसाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शिवसेनेने कोकणातील राजापूर (Rajapur) मतदारसंघातील आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांना उमेदवारी दिली आहे.

उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर आणि राजन साळवे यांच्यात लढत होणार आहे. त्यासाठी आता शिवसेनेकडून आमदारांना व्हीप (whip) जारी करण्यात आला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचे आदेश सुनील प्रभू यांनी दिले आहे. सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करून शिवसेनेच्या आमदारांना निर्देश दिले आहे, त्यामुळे आता शिंदे गट यावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्या होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना प्रताप सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला आहे. त्यानुसार पक्षाच्या सर्व आमदारांना आपल्या उमेदवाराला मतदान करणे बंधनकारक असते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार शिवसेना उमेदवाराला मतदान करणार का की भाजप उमेदवाराला मतदान करणार हे बघणे उत्सुकतेचे असेल. शिवसेनेच्या सुनील प्रभूंचा व्हिप मानला नाही, तर बंडखोर आमदारांविरोधात पक्षाकडून अधिकृतपणे कदाचित कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तर दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असल्याने भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करणं शिंदे गटासाठी अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण कुणाला मतदान करतं, हे उघडपणे स्पष्ट होणार आहे.

एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. या सरकारला विधिमंडळ विशेष अधिवेशनात आपले बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्षपदाची निवड करणे गरजेचे आहे. या पदासाठी शिंदे गट-भाजप आणि महाविकास आघाडीने देखील उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेने व्हीप जारी केल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता विधानसभेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेना आणि बंडखोर यांच्यात संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे