शिवसेनेतील गळती काही केल्या थांबेना आता नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे. इगतपुरी तालुक्याचे शिवसेना विधानसभा अध्यक्ष तसेच माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मेंगाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांचे समर्थन केले. सोबत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे देखील उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले त्यानंतर आता शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसतच चाललेत. आता पर्यंत शिवसेनेच्या बहुतेक आजी माजी आमदार, खासदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे. नाशिक जिल्ह्यात याची सुरवात दादा भुसे, सुहास कांदे यांनी केली. नंतर खासदार हेमंत गोडसे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. असे २ आमदार आणि १ खासदार यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात सेनेला धक्का बसला आहे. इगतपुरी तालुक्यातील शिवसेना विधानसभा अध्यक्ष माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या वेळी खासदार हेमंत गोडसे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ते शनिवारी ( दि.३०) येत आहे. मात्र ते येण्याचा अधिक नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला सुरुंग लागलेला दिसतो हे काशिनाथ मेंगाळ शिंदे गटात सामील झाल्यामुळे दिसत आहे. त्यामुळे ते आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात आणखी काय घडामोडी होतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.