नाशिकमधील एका बांधकाम व्यावसायिक तपास यंत्रणांकडे तक्रार करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देत ४७ लाखांची खंडणी मागणाऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. बांधकाम व्यवसायिकाला अशा प्रकारे धमकी देत खंडणी मागण्याची घटना समोर आल्याने बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार बांधकाम व्यावसायिकाकडे मागितलेल्या खंडणी प्रकरणी सरकारवाडा पेालीसांत गुन्हा दाखल होता. या गुन्हयातील संशयित मारुती खोसरे याने फिर्यादी समीर सोनवणे यांचे शरणपुर रोडवरील सुयश डेव्हलपर्स या ऑफिसमध्ये काम करीत असतांना महत्वाच्या डाटाची चोरी केली आणि त्याद्वारे तक्रारदाराला तपास यंत्रणेकडे तक्रार करण्याची त्यासोबतच जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. धमकी देत खंडणी स्वरुपात ५० लाख रुपयाची मागणी करुन, त्यापैकी ५ लाख रुपये खंडणीची रक्कम घेतली आणि उर्वरीत खंडणीचे पैसे देण्याचा तगादा लावला होता. या प्रकरणी फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता.
या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत संशयिताने तब्बल २५ लाख बुडाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने प्लान बनवला. त्याच्या प्लाननुसार तो पाच वर्षांपूर्वी ज्या बांधकाम व्यवसायिकाकडे कामास होता, त्यालाच तपास यंत्रणांची धमकी देत त्याच्याकडून तब्बल ५० लाखांची मागणी केली. त्यात पाच लाखांची रोकड सोमवारी (दि.२५) संशिताला देण्यात आली होती. तर उर्वरित रकमेसाठी संशयिताने पुन्हा फोन केल्याने बांधकाम व्यवसायिक समीर सोनवणे यांनी पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनतर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपी मारुती खोसरे याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची विचारपूस केली असता त्याने बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयातून व्यवसायाचा डाटा चोरून त्याची तपास यंत्रणांकडे तक्रार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे.
ही कामगिरी नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, संजय बारकुंड, पोलीस उप आयुक्त गुन्हेशाखा नाशिक शहर, वसंत मोरे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले व पोलीस अंमलदार रविंद्र बागुल यांच्या पथकाने केली आहे