नाशकातील धक्कादायक प्रकार! महिलेच्या तोंडाला काळ फासत गावभर धिंड..

नाशिक जिह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्या पत्नीला सासरच्यांनी मारहाण करत तिची गावभर धिंड काढली आहे. महिलेच्या तोंडला आधी काळे फासले, त्यानंतर तिच्या गळ्यात चपलांचा हार घातला व तिची गावभर धिंड काढली आहे. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिवरे या गावात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असून यावर नेटकरी प्रचंड संतापले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चांदवडमधील शिवरे गावी संबंधित महिला वास्तव्यास होती. तिला दोन मुली होत्या. काही दिवसांपूर्वी तिचा अपघात होऊन हात फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे महिलेला तिच्या पतीने आरामासाठी माहेरी पाठवले होते. त्यानंतर पती आपल्या दोन मुलींसह भेटायलाही गेला. पंरतु, अचानकच महिलेला एक फोन आला आणि त्याने तिला धक्काच बसला. तिला सांगण्यात आले, तुझ्या पतीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ही महिला शिवरे या गावी आली तेव्हा पतीचा दशक्रियाविधीचा कार्यक्रम सुरु होता. तिने तेथे हंबरडा फोडत ‘पती आत्महत्या करणार नाहीत त्यांचा घातपात झाला असेल, असा संशय व्यक्त केला.

या कारणावरून पतीच्या नातेवाईकांनी महिलेला मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी गावातील महिलाही पुढे सरसावल्या व त्यांनी देखील महिलेसोबत मुलांना मारहाण केली. एवढच नव्हे त्यात आणखी धक्कादायक म्हणजे, यावेळी महिलेच तोंड काळं करून चपलांचा हार घालत गावात धिंड काढण्यात आली.