By चैतन्य गायकवाड
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे श्रीपंच शंभु दशनाम जुना आखाडा येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे (Akhil Bharatiya Akhada Parishad) महामंत्री हरिगिरी महाराज (Harigiri Maharaj) आठ दिवसांपासून वास्तव्यास आले आहेत. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा व गुरुपुष्यामृत योगाचे औचित्य साधुन महामंत्री हरिगिरी, या आखाड्याचे महामंडलेश्वर शिवगिरीजी, श्री पंचायती आनंद आखाड्याचे गणेशाने सरस्वती, जुना आखाड्यातील विष्णुगिरी, निळकंठ गिरी, ईच्छागिरी, साध्वी शैलजा माता यांनी सकाळी कुशावर्तातीर्थात स्नान करुन आद्य ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वराचे दर्शन व अभिषेक पूजा केली. त्यांच्या समवेत आखाड्याचे पुरोहित त्रिविक्रम जोशी व प्रमोद बाळकृष्ण जोशी उपस्थित होते.
महामंत्री हरीगिरीजी महाराज यांच्याकडून त्र्यंबकेश्वर येथे २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. (Sihansth Kumbhmela 2027 date realeased)
गुरुपुष्यामृत मुहूर्तावर कुंभमेळ्याची तुतारी निनादली आहे.
सिंहस्थ ध्वजारोहण सुरवात
३१ऑक्टोबर २०२६
प्रथम शाही स्नान आषाढ अमावस्या २ ऑगस्ट २०२७
द्वितीय शाही स्नान ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय शाही स्नान
१२ सप्टेंबर २०२७
सिंहस्थ समाप्ती
२८ सप्टेंबर २०२८
पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर यांच्यावतीने वतीने वरील तिथी ज्योतिष शास्त्रानुसार काढण्यात आल्या. श्री पंच दशमान जुना आखडा राज्य अध्यक्ष महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज, साध्वी शैलाजामाता, त्र्यंबक आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरनंद सरस्वती महाराज, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर तसेच नगरपालिकेचे प्रतिनिधी, पुरोहित संघ प्रतिनिधी, ग्रामस्थ, साधू-महंत, साध्वी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुशावर्त तीर्थ परिसर विकासाचा नारळ वाढविण्यात आला. तत्पूर्वी कुशावर्त तीर्थावर गंगा पूजन करण्यात येऊन त्रंबकेश्वर व गोदावरीस प्रार्थना करण्यात आली. एकंदरीत २०२७ च्या कुंभमेळ्याची साठी जोरदार तयारी करू, असे संकल्प चित्र पाहायला मिळत आहे.
२०१५ च्या कुंभमेळ्यापेक्षा तिप्पट गर्दी २०२७ मध्ये होईल. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने भरघोस निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी त्रिवेणी तुंगार (उपनगराध्यक्ष), कैलास चोथे, दीपक लोणारी, पुरोहित संघाचे प्रतिनिधी त्रिविक्रमजोशी, राजेश दीक्षित तसेच श्री पंचदशी नाम जुना आखाड्याचे सचिव श्रीमंहत ठाणापती उपस्थित होते. आज गुरुपुष्याच्या मुहूर्तावर सिंहस्थाच्या तारखा जाहीर झाल्या झाल्या असल्या, तरी प्रत्यक्ष विकासाच्या दृष्टीने भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे महामंत्री हरीगिरिजी महाराज म्हणाले.