Home » ..आता मध्यप्रदेश सीमेलगतच्या काही गावांची मध्यप्रदेशात जाण्याची मागणी

..आता मध्यप्रदेश सीमेलगतच्या काही गावांची मध्यप्रदेशात जाण्याची मागणी

by नाशिक तक
0 comment

राज्यात एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेश सीमेजवळील ४ गावांनी मध्याप्रदेशात जाण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. या आधी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील काही आदिवासी गावांनी गुजरातमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी त्यांनी आंदोलनही पुकारलं होतं. आज पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. हे प्रकरण निवळले असताना आता मध्यप्रदेश सीमेलगत बुलढाण्यातील ४ गावांतील नागरिकांनी मध्यप्रदेशात जाण्याचा इशारा दिला आहे.

मुलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप

मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुलढाण्यातील ४ गावांच्या नागरिकांनी मध्यप्रदेश मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पाणीप्रश्न, आरोग्य सुविधा आणि शिक्षण या सारख्या मुलभूत सुविधा मिळता नसल्याचा आरोप करत मध्यप्रदेशच्या सीमेवरील ४ गावांनी महाराष्ट्र सरकारचे टेन्शन वाढवले आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर ही एक नवी समस्या राज्यापुढे उभी होताना पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळलेला आहे. अशातच कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करून वातावरण आणखी तापवलं आहे. पुण्याहून बंगळुरुकडे जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. वाहनांच्या नंबर प्लेट्स वर लाथा मारण्यात आल्या. त्यामुळे वाद चांगलाच उफाळून निघाला आहे. बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ल्याचा हा प्रकार घडला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याने आधीच पडलेल्या ठिणगीला हवा भेटली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तर आता मध्यप्रदेश सीमाभागातील ४ गावांच्या नागरिकांनी मध्यप्रदेशात जाण्याची मागणी केल्याने महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मध्यप्रदेश सीमेलगतच्या ४ गावांतील नागरिकांप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सुरगाण्याच्या सीमावर्ती भागातील ५५ गावांनी देखील गुजरात मध्ये समाविष्ट होण्याची मागणी केली होती. मुलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत या गावांनीही गुजरातच्या वासदा तहसीलदारांकडे गुजरातेत येण्याचे निवेदन दिले होते. मात्र या गावांच्या समस्यांबाबत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. बैठकीत आश्वासन देऊनही चिंतामण गावित यांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली त्यामुळे दादा भुसे आक्रमकही झाले होते. हे आंदोलन तर स्थगित झाले मात्र आता मध्यप्रदेश सीमाभागात नवीन समस्या उद्भवते आहे.

You may also like

Leave a Comment

सर्वात आधी ब्रेकिंग न्यूज साठी Join करा आमचा ग्रुप

error: Content is protected !!