श्रीरामपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला प्रतिकिलो १ रुपया असा कवडीमोल भाव मिळाल्याचा धक्का सहन न झाल्याने शेतकऱ्याने (farmer) आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आह्रे. भरत जाधव (३८) असे या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी भरत जाधव यांनी आपला कांदा श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात विक्रीसाठी आणला होता. जाधव यांनी आणलेल्या कांद्याला एका व्यापाऱ्याने प्रतिकिलो १ रुपया असा भाव देऊ केला. हा कवडीमोल भाव ऐकून जाधव यांना धक्का बसला. त्यांनी बाजार समितीच्या आवारातच विषारी औषध घेऊन आत्महत्या (suicide) करण्याचा प्रयत्न केला.
जाधव यांनी रविवारी कांदा विक्रीसाठी आणला होता. पण टाकळीभान उपबाजारात मंगळवारी व शुक्रवारी कांद्याचे लिलाव होतात. मात्र, जाधव यांच्या आग्रहाने एक व्यापारी कांदा विकत घेण्यास तयार झाला. पण, कांद्याची प्रत चांगली नसल्याने व्यापाऱ्याने कमी भाव सांगितला. कांद्याला कमी भाव मिळाल्याच्या धक्क्याने जाधव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
बाजार समितीतील उपस्थित कर्मचाऱ्यांनी जाधव यांना तातडीने रुग्नालयात (hospital) दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर असली तरी धोका टळलेला नसल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
सध्या कांद्याला सरासरी ७०० ते १००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कांदा चाळीत ठेऊन खराब होण्यापेक्षा थोडेफार पैसे मिळतील या अपेक्षेने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणतात. पण असा कवडीमोल भाव मिळत असेल तर खर्च तरी कसा भरून निघणार हा प्रश्न आहे. अश्या घटनांनी खचून जाऊन शेतकरी मग आत्महत्येचा पर्याय निवडतात.