नाशिक | प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे येथील शेतकऱ्याने बँकेच्या कर्जवसुली पथकाच्या तगाद्यामुळे गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे येथील संदीप राजेंद्र भुसाळ (वय २४) या तरुण शेतकऱ्याने पंजाब नॅशनल बँकेतून शेतीसाठी कर्ज घेतले होते. ते कर्ज थकीत असल्यामूळे बँकेचे अधिकारी नेहमी वसुलीसाठी येत होते.
दरम्यान बँक वसुली पथकाच्या तगाद्यामुळे कंटाळून व आत्महत्येपूर्वी त्याने ऑडिओ क्लिप व्हायरल करत रात्री दीड वाजेच्या घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
यावेळी कुटुंबीयांना प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यास झाडावरुन खाली उतरुवून दिंडोरी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषीत केले. दरम्यान आत्महत्येपूर्वी सदर तरुण शेतकऱ्याने याबाबतची ऑडिओ क्लीप व्हायरल केली. यात ‘मी आत्महत्या करीत असून, यात कोणाचा काही रोल नाही. पंजाब नॅशलन बँकेवाल्यांनी मला लई सळवलेय, मला आता शेवटची तारीख दिलेली आहे. ते काही तरी आता अक्शन घेणार आहे त्यामूळे मी आत्महत्या करीत आहे..” असे नमुद केले आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहे.