मजूर कोंबड्या चोरतो आणि त्या परस्पर विकतो ह्या संशयावरून हॉटेल मालकाने आपल्या मजुराला बेदम मारहाण केली, त्या मारहाणीत मजुराचा मृत्य झाल्याची खळबळजनक घटना येवला तालुक्यातील भारम येथे घडली आहे. बाळू गणपत नळे(वय ४९) असे मजुराचे नाव असून हा व्यक्ती येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारम येथे आरोपी हॉटेल मालक शेख जमीर मेहबूब याचे ‘बेस्ट’ नावाचे हॉटेल आहे. या ठिकाणी मृत बाळू गणपत नळे हे मजूर म्हणून काम करत होते, ३ जुलैच्या दिवशी हॉटेल मालकाने कोंबड्या चोरी करतो व त्या बाहेर विकतो या संशयावरून बाळू गणपत नळे यांना बेदम मारहाण केली. आरोपी मालकाने लाथा-बुक्क्यांने नळे यांच्या छातीवर आणि पाठीवर मारहाण केली. या बेदम मारहाणीत नळे यांच्या छातीत रक्त गोठले आणि त्यांचा मृत्यू झाल्याची भेदरवून टाकणारी घटना घडली, नळे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही,रक्त छातीतच गोठल्यामुळे नळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नळे यांचा मुलगा अर्जुन बाळू नळे याने आरोपी हॉटेल मालक शेख जमीर मेहबूब याचा विरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एन. राजपूत करत आहेत. घटनेचा तपास करून आरोपीला योग्य ती शिक्षा करण्यात येईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक यू. एन. राजपूत यांनी सांगितले.