ठाणे : ठाण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे . पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून पतीने संबंधित तरुणाची हत्या केली आहे . जयेश वळिंबे (26) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण 22 जुलैपासून बेपत्ता होता. तरुणाचा शोध घेत असताना तपासादरम्यान तरुणाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. हि घटना रविवारी उघडकीस आली आहे . याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपी पतीला अटक केले आहे. पुंडलिक वाळिंबे असे पोलसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे .
पोलिसांकडून मिळालेल्या महिती नुसार सदर मयत तरुण जयेश वाळिंबे हा 22 जुलैपासून अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मित्रांकडे चौकशी केली.त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांना खिनवली पोलीस ठाण्यात जयेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणाचा शोध सुरु केला. दरम्यान पोलिसांना एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता तो जयेशचाच मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
जयेशची हत्या झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्यानुसार तपास सुरु केला. चौकशीदरम्यान कुटुंबीयांनी पुंडलिक वाळिंबेवर जयेशचा हत्येचा आरोप केला. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली या वेळी पोलिसांना संशय आला आणि पुंडलिक वाळिंबेला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली . कोणताही पुरावा मिळू नये यासाठी तरुणाला वीजेचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याचे देखील संशयिताने सांगितले आहे . पोलिसांनी आरोपीला अटक केली असून. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.