नाशिक पोलीस एक्शन मोडवर, आता थेट तडीपारी

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी नाशिक पोलीस ऐक्शन मोडवर आले असून आता थेट तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान गेल्या महिनाभरात नाशकात खून, घरफोड्या, हाणामारी, चैन स्नॅचिंग या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नाशिक पोलीस सतर्क झाले असून आता गुन्हेगारांची खैर नसणार आहे. मागील आठवड्यात सातपूर परिसरात भाजप मंडळ अधिकाऱ्याच्या खून झाल्यानंतर भाजपसह स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. यामुळे नाशिक जिल्ह्यात पोलिसांवर टीकाही करण्यात येत होती. मात्र आता गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी नाशिक पोलीस आता आक्रमक झाले आहेत.

आता नाशिक शहरातील सराईत गुन्हेगारांवर थेट तडीपारीची कारवाई करण्यात येणार असून दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्यांवर हि कारवाई होणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांचा शोध सुरू आहे. शहराची सुरक्षाव्यवस्था पोलिसांनी कडक केली असून, सराईत गुन्हेगारांची सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धरपकड सुरू करण्यात आली आहे.

दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती देखील संकलित केली जात आहे. या गुन्हेगारांवर पोलिसांची कायमस्वरूपी नजरा राहणार आहेत.