शिर्डीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८८ जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. हे सर्व विद्यार्थी मुळचे अमरावती येथील असून सहलीसाठी शिर्डीत आले होते, त्यांनी त्यांचा मुक्काम नेवास्यात ठोकला होता, यावेळी रात्रीचे जेवण केले असता या विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखी, उलट्या-जुलाब सुरु झाले. विद्यार्थ्यांना शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. प्रीतम वडगावे यांनी सांगितले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील आदर्श हायस्कूलची सहल शिर्डीला आली होती. इयत्ता चौथी ते सहावीचे एकूण 230 विद्यार्थी सहलीला आले होते. सर्व विद्यार्थ्यांची शाळेने नेवासा येथे थांबण्याची व्यवस्था केली होती. नेवासा येथेच त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय करण्यात आली होती.
दरम्यान, सर्व विद्यार्थी मौज-मजा करत, सहलीचा आनंद घेत होते. खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांचे जेवण झाले. जेवण झाल्याच्या काही वेळानंतर अचानक काही जणांच्या पोटात दुखू लागले. त्यांना उलट्या-जुलाब सुरु झाले. यानंतर हा आकडा वाढला. २३० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८८ विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, रात्री 11 वाजता सर्व विद्यार्थ्यांना शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात आणि शाळा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये देखील घबराट पसरली आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. प्रीतम वडगावे यांनी सांगितल्यावर पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.