नाशिक जिल्हा बँकेतील मोठ्या १०० थकबाकीदारांचे नाव जाहीर करण्यात आली असून या थकबाकीदरांमध्ये आमदार दिलीप बोरसे यांच्या पत्नी संगीता बोरसे, आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे, माजी खासदार देविदास पिंगळे यांचे बंधू शिवाजी पिंगळे आदी नेत्यांसह जिल्हा परिषदेचे सभापती, सदस्य अशा सर्वपक्षीय बेड्या नेत्यांची नाव या यादीत असल्याने कर्जबुडव्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. खळबळजनक बाब म्हणजे जिल्हा बँकेच्या शेती कर्जाची एकूण थकबाकी १९१० कोटी असून त्या पैकी १३७० कोटी आजी माजी संचालकानीच थकवले आहे. या पूर्वी कर्ज थकवल्याप्रकरणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला आहे.
जिल्हा बँक कर्ज वसुलीसाठी उचलणार कडक पाऊले
मार्च २०२३ अखेर जास्तीत जास्त कर्ज वसुली होण्यासाठी कर्ज वसुली मोहीम राबवून व ह्या मोठ्या थकबाकीदारांचे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना सहकार कायदा १९६० व १९६१ चे नियम १०७ नुसार प्राप्त अधिकारान्वये मालमत्ता जप्ती करून जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६०० ते ७०० थकबाकीदारांचे स्थावर जप्ती करून ते लिलाव करण्यात येणार असल्याचे बँक प्रशासनाने सांगितले आहे.
प्रशासकांनी सूत्रे घेतली हातात
बँकेच्या प्रशासकानी बँकेची सूत्र हाती घेतल्यानंतर ज्या पद्धतीने कर्ज वसुलीसाठी बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन जंगम जप्ती व्दारे म्हणजेच थकबाकी झालेले वाहने ट्रॅक्टर, जीप ह्या सारख्या वाहनांची जप्ती करून, जवळपास ही ३५० वाहन होती. या वाहनांची लिलावाव्दारे ६ कोटी रकमेची वसुली झाली आहे.
जिल्हा बँकेकडून आवाहन
या १०० थकबाकीदारांची यादी जाहीर झाली असून लवकरच बँक ऍक्शन मोड मध्ये येणार आहे. तरी जिल्ह्यातील थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेचे प्रशासक श्री अरुण कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शैलेश पिंगळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.