नाशिक : शहरात घरफोडी, चोरीच्या घटना वाढत असताना नाशिक पोलिसांना चार वर्षांपासून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात यश आले आहे. चोरीचे सोने विक्री करणाऱ्या दोघा मित्रांना देखील अटक करण्यात आली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून चोरीचे ११ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार, हे संशयित दिवसा बंद फ्लॅटची रेकी करून घरफोडी करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांच्या पथकाने या तिघा संशयितांना पडघा येथे पाठलाग करून अटक केले आहे. तसेच त्यांच्याकडून एक दोन नाही तर तब्बल १२ गुन्हे उघडकीस झाले आहे. या संशयितांकडून ११ लाख, ७० हजार रुपये किंमतीचे १११.७९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
वाढत्या घरफोडीच्या घटनांमध्ये अजून एका घटनेची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ५५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी देवघरावर डल्ला मारला होता. त्यात तक्रारदार यांच्या घरातील देव्हाऱ्यातील चांदीचे घडवण असलेले देव आणि पूजेचे पितळी साहित्य चोरीला गेले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भद्रकाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी संशयित आरोपी आणि त्याला मदत करणारा त्याचा मित्र यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच चांदीचे घडवण असलेले देव आणि पूजेचे पितळी साहित्य तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली सोन्याची चेन असा एकूण ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या दोन संशयितांकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून, पोलीस आणखी तपास करत आहे.
या दोन्ही घटनांमध्ये नाशिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला असून एक सराईत देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. हा सराईत ४ वर्षांपासून घरफोड्या करत होता. तर त्याचे दोन साथीदार चोरीचे सोने विक्री करण्यात त्याची मदत करत होते. त्यांच्याकडून डझनभर गुन्ह्यांची उकल झाली असून ११ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तर दुसरी घटना भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत घडली असून त्यात संशयितांसह ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.