By, Pranita Borse
नाशिक : शहरात खासगी बसला भीषण आग लागून १२ जणांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन घटनास्थळी पाहणी केली आहे. तर त्यांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची देखील विचारपूस केली आहे.

आज पहाटेच्या सुमारास नाशिक शहरातील औरंगाबाद रोडजवळील मिरची हॉटेल परिसरात बसचा भीषण अपघात झाला. ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांत अपघात होऊन ट्रॅव्हल बसला भीषण आग लागली. पहाटेची वेळ असल्याने अनेकांना साखर झोपेत असतानाच मृत्यूने गाठलं. काही वेळेतच ही बस जळून खाक झाली. दरम्यान मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश देऊन ते नाशिकला दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची विचारपूस केली. तसेच उपस्थित मृतांच्या नातेवाईकांना आधार देत मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश..
या घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केलाय. त्यासोबतच सखोल चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. ‘चौकशी झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशा घटना पुन्हा होऊ नये याची दखल शासन, जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाईल, कोणाची चूक आहे हे चौकशी अंती समोर येईल तशी कारवाई करण्यात येईल, अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागाला सूचना केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. संपूर्ण नाशिकमध्ये अशा स्थळांवर “ब्लॅक स्पाॅट्स” वर जिथे वारंवार अशा घटना होत असतील तिथे उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहे. संपूर्ण महाराष्ट्रात असलेल्या अपघातांच्या स्थळांबाबत उच्चस्तरीय बैठक तातडीने संबंधित विभागांची घेतली जाणार असून भविष्यात असे अपघात होऊ नये यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिलेले आहेत.
जखमींचा उपचार मोफत तर काहींना पुढील उपचारासाठी दिले जाणार २ लाख..
गोविंदांच्या मृत्यूनंतर दहा लाखाची मदत देण्यात आली. मात्र नाशिकच्या अपघातग्रस्तांना जाहीर केलेली पाच लाखांची मदत ही तुटपुंजी असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत होत्या. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आहेत, ‘ सरकार संवेदनशील आहे. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे. या लोकांची काळजी सरकारने घेतली आहे. अपघातग्रस्तांना मदत जाहिर केली आहे.जखमींचा पूर्ण उपचार सरकार करेल. ज्यांचे ऑपरेशन झालेले आहेत त्यांनाही पुढील उपचारासाठी २ लाख रुपयाची मदत दिली जाईल.’