हिमाचल प्रदेशातील स्पिटी जिल्ह्यातील वेगवेगळ्या डोंगर पठारावर मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या एका व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंगर पठारावर मित्रासोबत फिरण्यासाठी इंदिरानगर येथील बांधकाम व्यवसाय कौस्तभ हुदलीकर हे गेले होते. दरम्यान उंचावर चढाई करत असताना त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला सुरुवात झाली आणि ते तिथून खाली उतरत असताना कोसळले. यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्वास घेण्यास त्रास होऊ उपचारादरम्याच हृदयविकाराचा झटका येत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संतोष यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

कौस्तुभ हे नाशिकच्या इंदिरानगर येथील मोदकेश्वर सोसायटीत राहणारे होते. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत अधिक माहिती जाणून घेतली असता. ते त्यांच्या दोन मित्रांसोबत २१ ऑगस्ट पासून पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशात गेले होते. डोंगरावर चढाई करण्याची आवड असल्याने त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. त्यातच गुरुवारी कौस्तुभ मित्रांसोबत स्पिटी जिल्ह्यातील काझा डोंगरावर चढाई करण्यासाठी गेले होते. साधारण दोन हजार फूट उंचीवरून गेल्यावर त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. अशा परिस्थितीत खाली उतरत असतानाच ते कोसळले. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कौस्तुभ हुदळीकर हे बांधकाम व्यवसायिक, कवी, लेखक आणि सावानाचे सदस्य असलेल्या संतोष हुदळीकर यांचे एकुलते एक पुत्र होते. ते वडिलांच्या व्यवसायात त्यांची मदत करत होते. या व्यवसायात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख देखील निर्माण केली होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक वर्षाचा मुलगा देखील होता. दरम्यान त्यांच्या मृत्यूच्या घटनेची बातमी कुटुंबीयांना कळताच त्यांनी हंबरडा फोडला.