नाशिक : ‘या शहराचे वातावरण इतके सुंदर आणि मनमोहक आहे की, या शहराच्या कोणीही प्रेमात पडू शकते. त्याचप्रमाणे सध्या होमेथॉन प्रदर्शनामध्ये विविध स्टॉलला भेट दिल्यानंतर त्यांच्यामार्फत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बघून मलाही नाशिकमध्ये घर घेण्याचा मोह होतो,’ अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केली आहे.

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन ‘ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे सुरू असून यानिमित्त दि. २३ रोजी सांयकाळच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित व निवेदिका किशोरी किणीकर या दोन्ही मुलाखतकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्राजक्ता यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर नरेडचे नाशिकचे अध्यक्ष अभय तातेड व वंदना तातेड, होमेथॉनचे समन्वयक जयेश टक्कर व जयश्री ठक्कर, सचिव सुनील गवादे व गीता गवादे, होमेथॉनचे सहसमन्वय शंतनु देशपांडे व असावरी देशपांडे, टायटल स्पॉन्सर दीपक चंदे व दीपा चंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, ‘मुंबईमध्ये आता घर घ्यायला जागा नाही, पुण्यातही प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांचा ओढा नाशिककडे दिसून येतो. त्यातच इथले हवा, पाणी आणि एकूणच वातावरण अत्यंत प्रसन्न, छान आणि सुंदर आहे. तसेच येथील निसर्गाचे वातावरण अत्यंत अल्हाददायक असल्याने ऑक्सिजन देखील चांगला मिळतो. त्यामुळे मला देखील नाशिकमध्ये घर घेऊन येथे राहायला आवडेल.’
या प्रदर्शनाची स्तुती करताना , ‘पहिल्यांदाच मी इतके मोठे प्रदर्शन बघितले असून नरेडकोच्या प्रदर्शनामुळे बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदी करणारे ग्राहक यांच्यामध्ये एक चांगला दुआ तयार होईल, असे तोंडभरून त्यांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले आहे.
कार्यक्रमाचे प्रारंभी त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देऊन तेथील गृहप्रकल्पांची माहिती घेतली. प्रारंभी प्राजक्ता माळी यांचा पैठणी देऊन तसेच चांदीची भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकात जयेश टक्कर आणि सुनील गवादे यांनी नारेडकोची तसेच होमेथॉन प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी प्राजक्ता माळीच्या हस्ते पुरुषोत्तम देशपांडे व शाल्मली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राजक्ता माळी यांच्या हस्ते घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देऊन सत्कार करण्यात आला.