काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महापालिका निवडणुकांवर मोठे वक्तव्य केले असून कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याचा नारा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिला आहे. मविआ सरकार सत्तेतून खाली आले तरीही मात्र मविआ आगामी निवडणुका एकत्रच लढणार याचे सुतोवाच तिन्ही पक्षांकडून येत होते मात्र पटोले यांनी आता या चर्चांना ब्रेक लावला असून महापालिका निवडणुकांत काँग्रेस स्वबळावर लढणार स्पष्ट झाले आहे.
नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधारी पक्षांवर चांगलाच हल्लाबोल केला असून त्यांनी अनेक मुद्यांवर शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, सत्ता बदल झाल्यानंतर ओबीसी स्कॉलरशिप थांबवण्यात आली तसेच वेदांता सारखा उद्योग गुजरात मध्ये पाठवण्यात आला त्यामुळे जर उद्या मुंबई सुध्दा गुजरातमध्ये गेली तर आश्चर्य वाटायला नको अश्या खरमरीत टीका देखील पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केल्या आहेत.
आज कॉंग्रेसचा उत्तर महाराष्ट्र मंथन मेळावा
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली की, कॉंग्रेसच्या वतीने आज उत्तर महाराष्ट्रात ओबीसी मंथन मेळावा घेण्यात येणार आहे. तसेच ओबीसीच्या मुद्यावरून प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, सत्ता बदल झाल्यानंतर ओबीसी स्कॉलरशिप थांबवण्यात आली अशी टीका पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. देशभरातील ओबीसी समाजावर अन्याय करण्यात येत आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी ही आमची प्रमुख मागणी असेल असे यावेळी पटोले म्हणाले.
राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर जाणार असून त्यांचा दौऱ्यावर प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले, कुणाला कुठे जायचे आहे ते जाऊ शकतात कारण त्यांना ते स्वातंत्र्य आहे. पण विदर्भात काँग्रेसची ताकत कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.