शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळाल्यानंतर राज्यभरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गट जल्लोष साजरा करताना दिसत आहे. तर दुसरीकडे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या या जल्लोषावर ट्विट करत खोचक टोला लगावला आहे. “फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगीच मिळाली ना ??, मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील नाचे कुठले” असा उपरोधिक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

आता शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नेमका कुणाचा एकनाथ शिंदे गटाचा की उद्धव ठाकरे गटाचा यावरून गेल्या काही दिवसात अनेक चर्चा, दावे-प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप झाले. मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्याची परवनागी दिली असून, आता उद्धव ठाकरेंचीच तोफ शिवतीर्थावर धडाडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असतानाच नितेश राणे यांनी असं ट्विट केले आहे. तर आता शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याची देखील माहिती मिळाली आहे. यासंदर्भात शिवसेना नेते अनिल परब यांना विचारले असता, आम्ही हे सुप्रीम कोर्टात पाहू, तिथेही लढू, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिलीये.

एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे..
उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मिळावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरची सुनावणी आज पार पडली. दोन्ही पक्षांकडून जबरदस्त युक्तीवाद करण्यात आला. तब्बल चार तास हा युक्तिवाद चालला. यावेळी कोर्टाने महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. ‘शिवसेना कोण यात आम्हाला पडायचं नाही’ असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलं. शिवसेनेला याआधीही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली होती असं असताना दोन्ही गटाचे अर्ज फेटाळणे हा महापालिकेचा निर्णय योग्यच होता असे देखील कोर्टाने म्हटलंय. त्यानंतर उच्च न्यायालयाचा हा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबरला शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय लागला आणि एकीकडे उद्धव ठाकरे गट जल्लोष साजरा करत आहेत तर दुसरीकडे नितेश राणे यांनी खोचक टोला लगावला आहे.