By चैतन्य गायकवाड |
मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडात शिवसेनेचे अनेक आमदार सहभागी झाले आहे. या बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरातील शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहे. या संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून विरोध करण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिक हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. या आमदारांचे कार्यालये फोडत आहेत, त्यांच्या फ्लेक्सला काळं फासत आहेत. या सगळ्या विपरीत परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) घेतलेल्या निर्णयानुसार, आजपासून पुढील १५ दिवस, म्हणजेच १० जुलैपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू (section 144 implement) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही पक्षाने किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याने कायदा हातात घेऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जमावबंदी लागू केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक पेटून उठले आहेत. राज्यातील विविध शहरात बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक निदर्शने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात विशेषत: मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pande) यांनी काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांची भेट घेतली. त्यानंतर आज मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चर्चा केली. त्यानंतर मुंबईत जमाव बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एएनआय या वृत्त्संथेने या संदर्भात वृत्त दिले आहे…
दरम्यान, ठाण्यात (Thane) देखील संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ठाणे येथे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बघता, पुढील पाच दिवस ३० जूनपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिसरात लाठ्या तसेच शस्त्र बाळगणे, पोस्टर जाळणे, पुतळे जाळणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
सध्या मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत फुट पडल्याचे दिसून येत आहे. पण सामान्य शिवसैनिक आजही ठाकरे यांच्या सोबत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते या बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करत आहे. तर काही ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचेही दिसून येत आहे. या बंडखोर आमदारांपैकी काही आमदारांच्या कार्यालयाची संतप्त कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच काही शहरांत मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (CM and party chief Uddhav Thackeray) यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचेही दिसत आहे. औरंगाबाद, नाशिक, मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, कोल्हापूर तसेच इतर शहरांत देखील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.