पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने आपली वारंवार छेड काढणाऱ्या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी त्याचे गुप्तांगच छाटले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १२) कात्रजमध्ये घडली असून या विचित्र घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महिलेसह तिच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम निलेश वाडकर असे आरोपी महिलेचे नाव आहे. ही महिला पुण्यातील एका मयत झालेल्या गुंडाची पत्नी आहे. एक तरुण सतत तिची छेड काढत होता. आरोपी महिलेने व्हाट्सअपवर मेसेज करून त्या तरुणाला स्वामी नारायण मंदिर, आंबेगाव खुर्द, पुणे येथील चौपाटीवरील हॉटेलसमोर भेटण्यासाठी बोलावले होते. तिथे बेदम मारहाण केली व गंभीर जखमी केले त्यानंतर त्याला तिथून गाडीवर बसवून मुंबई-बेंगळुरू हायवेने नवीन कात्रज बोगद्यातुन शिंदेवाडी येथून कात्रज जुना बोगदा खेड शिवापुरच्या बाजूच्या रोडपासून थोडे पाठीमागे असलेल्या रस्त्याने आडबाजूला नेले.
व तिथे पुन्हा त्याला मारहाण करत त्याचे गुप्तांग छाटले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तू जर पोलिसांकडे तक्रार केल्यास खानदान संपवून टाकण्याची धमकी तरुणाला दिली. याबाबत तरुणाने आरोपी पुनम निलेश वाडकर आणि तिच्या इतर तीन साथीदारांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.