नाशिक: दुचाकी फिरवण्याची हौस आणि लवकारात लवकर श्रीमंत होण्याची इच्छा त्यामुळे अल्पवयीन मुलाने चक्क दुचाकी चोरी (Bike theft) व्यवसायच सुरू केला. पण दुचाकी वाहन चोरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) संशयित आरोपी कैद झाला आणि पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
हा अल्पवयीन आरोपी नाशिक शहराजवळील (Nashik) ग्रामीण भागात राहणारा आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह मोलमजुरीवरच चालतो. लवकर श्रीमत व्हायची इच्छा आणि आजूबाजूला स्टायलिश वाहन घेऊन फिरणारे लोक पाहून या अल्पवयीन मुलाच्या मनातही ही वाहन फिरवायची हौस निर्माण झाली. ती हौस पूर्ण करण्यासाठी या अल्पवयीन मुलाने चक्क दुचाकी वाहन चोरी करायचे ठरवले. यासाठी त्याने दुचाकी वाहनांच्या (Two wheeler) वायरिंगची मोडतोड करून चोरी करण्यास सुरुवात केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र पेटारे यांचे दुचाकी वाहन नांदूरनाका येथून चोरीला गेले. ही घटना जून अखेरची आहे. नांदूरनाका ही हद्द आडगाव पोलीस ठाण्यात अंतर्गत येते. त्यामुळे आडगाव पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. या घटनेचा तपास हवालदार सुरेश नरवडे यांच्याकडे देण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील तपासात असे समोर आले की घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज बसवलेले होते. ते तपासले असता एकजण दुचाकी चोरी करून नेत असल्याचे स्पष्ट दिसले. पुढे तपासला वेग देत पोलिसांनी आडगाव हद्दीतून ताब्यात घेतले आणि चौकशीतून या अल्पवयीन मुलाने चक्क एकामागोमाग तीन दुचाकी वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या दुचाकी नाशिकरोड आणि आडगाव पोलिसांच्या हद्दीतील आहेत. दरम्यान संशयित आरोपीची पुढील चौकशी सुरू आहे.