By : Pranita Borse
नाशिक : राज्यभरासह नाशिकमध्ये थंडीचा कडाका जाणवायला लागला आहे. नाशिकमध्ये किमान तापमानात घसरण होऊन वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. निफाड येथे गुरुवारी निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडमध्ये पारा ८.१ अंशावर तर नाशिकमध्ये १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली (Cold in Nashik, Niphad recorded 8.1 degrees Celsius while Nashik recorded 10.4 degrees Celsius.). राज्यात धुळे आणि नाशिक या शहरांमध्ये किमान तापमानात चांगलीच घसरण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कॅलिफोर्निया अशी निफाडची ओळख आहे. जिल्ह्याच्या या कॅलिफोर्नियामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे निफाडकर गारठले आहेत. निफाड तालुक्यात मागील सहा ते सात दिवसांपासून थंडी वाढायला लागली होती. तालुक्यात बुधवारी १३.२ दोन अंश सेल्सिअस त्यानंतर ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि तीन दिवसानंतरच ३ अंश सेल्सिअसणे घट होऊन एकदमच पारा ८.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यामुळे शुक्रवारी पहाटे वातावरणात थंडीचा कडाका जाणवला. सकाळी नऊ वाजेपर्यंत हा गारठा जाणवत होता आणि त्यामुळे निफाडकर चांगलेच गारठले होते.
यंदा थंडी थोडी उशिरा पडली. मात्र तरी पारा घसरून आर्द्रता कमी होत नव्हती. त्यामुळे नाशिककरांना ती हुडहुडी जाणवलीच नाही. मात्र शुक्रवारी तापमानात घसरण झाल्याने सायंकाळनंतर नाशिककरांना कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. शुक्रवारी हंगामातील सर्वात निश्चांकी १०.४ अंश सेल्सिअस अशी नोंद शहरात झाली आहे. विशेष म्हणजे आता पुढील तीन ते चार दिवस उत्तर महाराष्ट्रात हा थंडीचा कडाका वाढत जाणार आहे, असं वेधशाळे कडून वर्तवण्यात आलं आहे.
काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असल्यामुळे शेजारी असलेल्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका पसरला आहे. तर महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रामधील किमान तापमानात घसरण झाली असून नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) सांगली, पुणे या जिल्ह्यांमध्ये ही थंडीचे प्रमाण वाढले आहे आणि ही थंडी पुढील तीन दिवस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील किमान तापमान पाहता निफाड ८.१, नाशिक १०.४, धुळे ९.०, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ११.४, पुणे ११.२, परभणी १४.६, जळगाव १०.३, सातारा १५.२, उदगीर १४.६, महाबळेश्वर ११.०, जालना १४.०, अहमदनगर ११.४, बारामती १४.३, सांगलीत १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.