आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना उस्मानाबाद न्यायालयाने 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार कडू कोर्टात हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने कडू यांच्या अटकेचे वॉरंट काढले होते. यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याची तंबी देखील जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली. मागील तीन वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित असून आता कडू यांना ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आंदोलनादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर कडू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 14 जानेवारी 2019 पासून प्रकरण प्रलंबित असल्याने उस्मानाबाद कोर्टाने बच्चू कडू यांना खडे बोल सुनावले आहेत. यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याची तंबी देखील जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली आहे.
बच्चू कडू
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून गुवाहाटीला पलायन केले त्यावेळी त्यांच्यासोबत अपक्ष आमदार बच्चू कडू देखील होते. बच्चू कडू यांच्याकडे राज्यात मंत्रिपद असून त्याचा त्याग करून त्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला होता. गुवाहाटीवरून एकनाथ शिंदे महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यात पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अपक्षांना आणि स्त्रियांना डावलून भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून काही नेते नाराज असून त्यात नाराजांमध्ये बच्चू कडू यांचे देखील नाव आहे.
मंत्रिपदावर बच्चू कडू म्हणाले होते, मी स्वतःसाठी नाराज होणार नाही मात्र शेतकऱ्यांसाठी नक्की नाराज होईल. त्यामुळे पुढचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो आणि त्यात कडू यांना मंत्रिपद मिळून त्यांची नाराजी दूर होते का नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल.