नाशिक : पोलीस ठाण्यात (Police Station) बेपत्ता म्हणून तक्रार दाखल असलेल्या मंगळवारी राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी यांचा मृतदेह मिळून आला आहे. दरम्यान राधेशाम यांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिस ठाण्यात राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी बेपत्ता म्हणून पोलीसांनी गुन्हा नोंद करून घेतला होता. मात्र दोन दिवस उलटल्यावर गंगापूर पोलीसांना बापू पुलाजवळ एक मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला होता, त्याची चौकशी केली असता राकेश उर्फ राधेशाम यांचाच तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले होते.
राकेश यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. त्यावेळी गंगापूर पोलीसांनी तपासात काही आढळून आल्यास गुन्हा दाखल करू अशी माहिती नातेवाईकांना दिली होती. त्यानुसार गंगापूर पोलीसांनी याबाबत तपास करत असतांना धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रियकर आणि स्वतः पत्नी पतीला मानसिक त्रास देत असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
राधेशाम यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची बाब त्यांना कळली. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने पती मानसिक तणावात गेला होता. दरम्यान पत्नी आणि तिचा प्रियकर त्यांना त्रास देऊ लागला. त्यामुळे पती राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव बैरागी (३४ वर्ष) यांनी आत्महत्या केली, अशी माहिती आहे.
यावरून गंगापूर पोलीसांनी केलेल्या तपासाच्या अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याने पत्नी आणि प्रियकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी यांचा मृतदेह बापू पुलानजीक तरंगताना बोटिंगला आलेले अंबादास तांबे यांनी बघितला होता. त्यानंतर त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती कळवली होती. अंबड पोलिस ठाण्यात राकेश यांची तीस वर्षीय पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक संबंधातून हत्येचे प्रमाणही वाढले
महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून हत्याकांडाच्या घटनांतही सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात २ हजार ३३० हत्याकांडाच्या घटना घडल्या असून सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या हत्याकांड राज्यात पुणे शहर पहिल्या स्थानावर आहे.