by : ऋतिक गणकवार
नाशिक : शहरात तीव्र थंडीचा तडका जाणवायला लागला असून आता नाशिक गारठलय, तापमानाचा पारा १३.२ अंश सेल्सिअसवर स्थिरावला असून नाशिककरांना गुलाबी थंडी अधिक जाणवायला लागली आहे. पहाटे व रात्रीच्या सुमारास नाशिककरांना सध्या थंडी जाणवत असून नागरिकांचा उबदार कपडे आणि स्वेटर घेण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचे चित्र आहे.
मागील दोन दिवसांपासून किमान तापमानात एक अंशाने वाढ झाली आहे. शनिवारीही (दि. ५) किमान तापमानाचा पारा १३.२ अंश सेल्सिअसवर स्थिरावला. शहरात सोमवार ते बुधवारपर्यंत थंडीचा कडाका वाढलेला जाणवला. सलग दोन दिवस राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले.
कडाका आणखी वाढणार
शहरात थंडीच्या तीव्रतेत पुढील काही दिवसांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडा आता संपणार असून, पुढील आठवड्यात तापमानात अधिक घसरण होऊ शकते. तसेच कमाल तापमानातसुद्धा वाढ झाली आहे. कमाल तापमान शुक्रवारी ३१ अंशावर तर शनिवारी ३०.६ अंश इतके नोंदविले गेले. यामुळे सकाळी सूर्यकिरणे पडताच वातावरणातील गारवा नाहीसा होत आहे. तसेच पहाटे आर्द्रतेचे प्रमाणही कमी झाले आहे. शनिवारी सकाळी ६१ टक्के आर्द्रतेचे प्रमाण नोंदविले गेले.
नागरिकांची गर्दी वाढली
शहरात मोठ्या संख्येने नागरिक सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. या कडकत्या थंडीमुळे नागरिक घराबाहेर पडत आहेत आणि शरीराला उब मिळावी म्हणून व्यायाम, कसरती करत आहेत. तसेच बदलत्या ऋतुमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे. बहुतांश नागरिकांना शीतहंगामाची चाहूल लागताच सर्दी पडसेच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत.