जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घ्या : राज ठाकरे

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) हे राज्यभर दौरे करून आपल्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचे काम करत आहेत. सध्या ते कोकण (Konkan) दौऱ्यावर असून आज त्यांनी खेड (khed) येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला असून, जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घ्यायची तयारी ठेवा असा आदेश दिला आहे. राज ठाकरे मागील २-३ दिवसांपासून कोकण दौऱ्यावर असून कोकणात पक्ष बळकट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यात स्फुरण भरण्याचे काम राज ठाकरे करताय.

आज त्यांनी खेड येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घ्यायची तयारी ठेवा. तुमच्यासाठी वकिलांची फौज तयार ठेवेन, जसे समोरचे वागतील, तसंच आपण पण वागायचं. त्यांनी हात उचलला तर आपणही हातच उचलला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

लवकरच कोकणात मनसे पक्ष बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. येत्या जानेवारी महिन्यात चिपळूण येथे माझी जाहीर सभा होईल, असे देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

दरम्यान, येत्या निवडणुकांसाठी मनसेने आतापासूनच कंबर कसली असून राज ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. राज ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा संपल्यानंतर लगोलग ते कोकण दौऱ्यावर निघाले. कोकणात मनसेला अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी कोकणवासियांना साद घातली असून येत्या निवडणुकीत मनसेला कोकणात भरभरून यश मिळेल अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे.