ठाकरे गटाला पुन्हा धक्का ! दिग्गज नेत्याची मुलगी शिंदे गटाच्या वाटेवर

नाशिक :  गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अडचणी वाढत आहे. ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून शिंदे गट ठाकरे गटाला धक्के पे धक्का देत आहे. अशात आता ठाकरे गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे.

माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. माजी मंत्री आणि माजी आमदार घोलप पिता पुत्र यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा सुरू असतांना दुसरीकडे त्यांच्याच मुलीने शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी केली आहे. या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री यांनी देखील ग्रीन सिग्नल दिल्याच्या चर्चा आहेत.

बबन घोलप हे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. दरम्यान माजी समाज कल्याण मंत्री तसेच ५ वेळा आमदार राहिलेल्या बबन घोलप यांच्या घराला सुरुंग लागण्याचा अंदाज यामुळे बांधला जात आहे. घोलप कुटुंबातील पिता पुत्र आणि एक कन्या माजी महापौर नयना घोलप शिवसेना उद्धव ठाकरे गटात आहेत. तर दुसरी कन्या तनुजा घोलप लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसापूर्वी संजय राऊत यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्याला माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार योगेश घोलप, कन्या माजी महापौर नयना घोलप उपस्थित होते. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप यांनी त्यांच्याशी भेट घेत या आणि समज माध्यमांवर फोटो शेअर करत चर्चांना दुजोरा दिला आहे. त्यामुळे तनुजा घोलप यांचा प्रवेश लवकरच होणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अडचणी वाढत आहे. ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटाचा मार्ग धरल्या नंतर ठाकरे गटाला भगदाड पडले. ठाकरे गटातून आउटगोइंग सुरूच असून मागील पंधरा दिवसांत जवळपास ७० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे असलेले भाऊसाहेब चौधरीच शिंदे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. तर आता परत ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.