ठाकरे गट vs शिंदे गट; पुन्हा झाला राडा, वाद चिघळणार?

शिवसेनेच्या दोन्ही गटांमधला वाद काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीये पुन्हा एकदा धारावीत शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वाद झाला असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शिंदे गट समर्थकांनी ठाकरे गटाविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी ठाकरे गटातील सात ते आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.


पुन्हा काय घडले?

धारावी मिल कंपाऊंड येथील मॉर्निंग स्टार शाळेत सदा सरवणकर गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान वाद झाला. बैठक संपल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी केला. रिडन फ्रान्सिस फर्नांडो यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश सूर्यवंशी, मुथू पठाण, चेतन सूर्यंवशी यांच्यासह इतर चार ते पाच कार्यकर्त्यांविरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धमकावणे, जमाव बंदी, पोलिसांचा आदेश न मानणे अशा विविद कलमांतर्गत धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी केली मध्यस्थी

या घटने दरम्यान पोलिसांनी मध्यस्ती करीत शिवसैनिकांना शांत केले. त्यानंतर शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपतीच्या काळात एकमेकांना चिथावणी दिल्यामुळे शिंदे गट व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला होता. या पाठोपाठ आता धारावीतही पुन्हा नवा वाद झाला असून शिंदे गट ठाकरे गटातील नाराजी आणखीनच वाढत चालली आहे.