चिमुकलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत! २ दिवसांपासून होती बेपत्ता

भंडारा : खेळण्यासाठी गेलेली चिमुकली पुन्हा परतलीच नाही, दोन दिवसांपासून तिचा शोध सुरु होता. मात्र आज तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत गावाशेजारील असलेल्या एका शेतातील तनशीच्या ढिगाऱ्यात आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना साकोली तालुक्यातील पापडा खुर्द येथील आहे. श्रद्धा किशोर सिडाम (वय 8 वर्षे) असे चिमुकलीचे नाव असून ती इयत्ता तिसरीत शिकत होती. तिच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून सिडाम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम असल्याने शाळेने सोमवारी दुपारनंतर सुट्टी दिली होती. श्रद्धा घराशेजारी खेळायला गेली होती. मात्र, संध्याकाळ होऊनही ती घरी परतली नाही. कुटुंबियांना तिची काळजी वाटू लागली. यानंतर कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तिचा शोध लागला नाही. यानंतर कुटुंबियांनी साकोली पोलिसात तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी श्रद्धाचा शोध सुरु केला. मात्र काही हाती आले नाही. आज काही ग्रामस्थांनी श्रद्धाचा मृतदेह एका शेतातील तनशीच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत बघितला. त्यानंतर घटना वाऱ्यासारखी पसरली. गावात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. 

याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भंडारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी तपासाचे चक्र अधिक वेगाने फिरवले असून लवकरच घटनेचा उलगडा करून आरोपींना अटक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.