नाशिक रोड : नाशिक रोड (Nashik road) परिसरात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस स्थानकात (Nashik road police station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हा खून असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
आज ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सोमनाथ चिमनराव जाधव (वय ५७ रा. गोरेवाडी, शास्त्रीनगर) यांनी पोलिसांना माहिती दिली. ही व्यक्ती त्याच्या गोरेवाडी, शास्त्री नगर परिसरातील चडे मळा येथील उसाच्या शेतात सकाळी साडे दहाच्या सुमारास कामगार ऊस तोडणीसाठी गेले असता उसाच्या शेतात अंदाजे १५ फुटावर एक स्त्री जातीचे प्रेत दिसून आले. उसाच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी सोमनाथ जाधव यांना कळविल्याने, त्यांनी शेतात जावून खात्री केली. त्यांनत जाधव यांनी या घटनेची माहिती नाशिक रोड पोलिसांना दिली. नाशिकरोड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली.
पोलिसांना गोरेवाडी, शास्त्रीनगर कडून संभाजीनगर एकलहरा रोडकडे जाणारे कॅनल रोड लगत असलेल्या जाधव यांच्या उसाच्या शेतात रोड पासून अंदाजे १५ फूट अंतरावर एक स्त्री जातीचे प्रेत साधारणतः दोन तीन दिवसापूर्वीचे (कुजण्यास सुरवात झालेली) आढळून आले. ह्या स्त्री प्रेताचे वय अंदाजे २० ते २५ वर्षे असून, हे प्रेत उतान्या स्थितीत आढळून आले. ह्या मयत स्त्रीच्या गळ्यात ओढणी गाठ मारून बांधलेली दिसून आली. मयत स्त्रीच्या अंगावर इतर कोठेही जखमा नाहीत.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून, सदर प्रेत पोस्टमार्टमसाठी (post mortem) सिव्हिल हॉस्पिटल (civil hospital) नाशिक येथे रवाना केले. या प्रकरणी शेत मालक यांच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून पोस्टमार्टमचा अहवाल प्राप्त करून त्यांच्या अहवालाप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई होईल. दरम्यान, या मयत स्त्रीची ओळख पटवण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहे.