नवी दिल्ही: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२१ च्या परीक्षेचा निकाल (result) जाहीर केला आहे. या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. देशात (AIR) पहिल्या तीन क्रमांकावर मुलीच आहेत. श्रुती शर्मा (Shruti Sharma) देशात पहिल्या क्रमांकावर असून अंकिता अग्रवाल (Ankita Agraval) आणि गामिनी सिंगला (Gamini Singala) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. ऐश्वर्या वर्मा (Aishwarya Varma) चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर उत्कर्ष द्विवेदी (Utkarsh Dwivedi) आहे. यंदा देशभरातून केंद्रीय लोकसेवा आयोगाने एकूण ६८५ उमेदवारांची निवड केली आहे.
अव्वल स्थान पटकावलेली श्रुती शर्मा ही जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (Jawaharlal Nehru University) माजी विद्यार्थिनी आहे. या उत्तीर्ण विध्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) ४७ उमेदवारांनी यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. प्रियंवदा (Priyanvada) देशभरातून १३ व्या क्रमांकावर आहे. पहिल्या १५ क्रमांकामध्ये प्रियंवदा एकमेव मराठी उमेदवार आहे.
UPSC CSE प्राथमिक परीक्षा (Preliminary exam) १० ऑक्टोबर २०२१ रोजी झाली आणि प्राथमिक परीक्षेचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा (Main exam) ७ ते १६ जानेवारी या कालावधीत घेण्यात आली. मुख्य परीक्षेचा निकाल १७ मार्च २०२२ रोजी घोषित झाला. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीची (Interview) शेवटची फेरी २६ मे पर्यंत चालली. त्यांनतर अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Service), भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Forein Service), भारतीय पोलिस सेवा (Indian Police Service) आणि केंद्रीय सेवा गट ‘अ’ (Group A) आणि गट ‘ब’ (Group B) मध्ये सेवेची संधी मिळणार आहे. आज जाहीर झालेल्या अंतिम निकालात २४४ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील (Open category) आहेत तर ७३ उमेदवार हे EWS प्रवर्गातील आहेत. २०३ उमेदवार हे OBC प्रवर्गातील आहेत तर १०५ उमेदवार हे SC प्रवर्गातील आहेत. ST प्रवर्गातील ६० उमेदवार असून असे एकूण ६८५ उमेदवार हे नागरी सेवेसाठी (Civil Services) निवडण्यात आले आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने ६३ उमेदवारांना रिझर्व्ह विभागात ठेवले आहे.