चादंवड: पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला असून, सतत पडणाऱ्या पावसामुळे चांदवड शहरात ठिक ठिकाणी पाणी साचून, मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यांमधून शहरात नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे. शहरातील रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढलेले आहे. रोजच किरकोळ अपघात होत असल्याचे कानावर येत आहे. यामुळे वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
अगोदरच चांदवड नगर परिषदेतर्फे २४ तास पाणी योजनेसाठी शहरातील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यात पाऊस असल्याने शहरातील रस्त्यात पाणी साचण्यास हे खड्डे कारणीभूत ठरत आहेत. चांदवड शहरातील मुख्य बाजारपेठेत पावसाचे पाणी साचून मोठमोठे खड्डे तयार झाले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने असून, रस्त्याच्या कडेला अनेक फेरीवाले पथविक्रेत्यांची दुकाने आहेत. या खड्ड्यांमध्ये साचलेला पाण्यामुळे तेथील विक्रेत्यांना, फेरीवाल्यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे.
नगरपरिषदेला वारंवार रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याची तसेच या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी व पाणी साचणार नाही याच्यासाठी पर्याय व्यवस्था करण्याची मागणी केली गेली असूनही अद्याप पर्यंत चांदवड नगर परिषदेतर्फे कारवाई कोणतीही करण्यात आली नाही. हा वर्दळीचा रस्ता असल्याने या रस्त्याच्या मध्यभागी पावसाचे पाणी साचले आहे. नागरिकांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, नागरिकांमध्ये साचलेले पाणी आणि खोदलेल्या रस्त्यांवरून रोष पाहायला मिळत आहे.