By Pranita Borse
राज्यात काही दिवस चाललेल्या सत्ता नाट्यनंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde, Devendra Fadanavis) सरकार स्थापन झाले. मात्र अद्यापही ‘शिवसेना’ पक्ष (Shivsena Party) आणि ‘धनुष्यबाण’ या शिवसेनेच्या निशाणीबद्दल एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत वाद पहायला मिळत आहे.
एकीकडे शिंदे गटाकडून शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे ‘धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. ते कोणालाही हिरावून घेता येणार नाही’ अशी काही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना देत आहेत. ‘धनुष्यबाण’ निशाणी संदर्भात दोन्ही बाजूंनी निवडणूक आयोगाला पत्र देखील देण्यात आले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या चिन्हावर ८ ऑगस्टला निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण निशाणी मिळवण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. याबाबत येत्या ८ ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. तेव्हा दोन्ही बाजूने योग्य ती कागदपत्रे घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगापुढे उपस्थित राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.
धनुष्यबाण निशाणीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाने थेट निवडणूक आयोगाकडे (election commission) धाव घेतली होती. आमच्या गटाला शिवसेना (Shiv Sena) म्हणून मान्यता द्या, अशी मागणी शिंदे गटाने केलीये आणि तसे पत्र देखील निवडणूक आयोगाला देण्यात आलेय. आमच्याकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. ५० आमदार आणि १२ खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या पत्राआधीच शिवसेनेनेही निवडणूक आयोगाला एक पत्रं दिलेलं आहे. शिंदे गटाकडून कोणताही दावा केला गेल्यास आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिवसेनेने निवडणूक आयोगाला केली होती. अशाप्रकारे दोन्हीकडून पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात धाव घेतल्याने शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता धनुष्यबाण कोणाच्या वाट्याला जातो याबद्दल आठ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.