सुरगाणा तालुक्यातील अलंगुण गाव १० दिवसांपासून काळोखात आहे. अलंगुण गावचा बंधारा फुटला आणि अवघ्या काही मिनिटात संपूर्ण गाव जलमय झाले. त्यात गावातील आठ ते दहा विजेचे खांब कोसळले,वीज तारा तुटल्या आणि वीजपुरवठा खंडित झाला. तेव्हा पासून तर आत्ता पर्यंत हे गाव अंधारातच आहे. वीज वितरण कंपनीकडून गावाकडे दुर्लक्ष केले जाते आहे. गावच्या आजूबाजूला दाट जंगल आहेत. त्यात अनेक श्वापदे, वन्यजीव आहेत. त्यांच्या पासून गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धोका आहे. तरीही अद्याप वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत न केल्याने गावकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढावले आहे.
अलंगुण येथे १२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने तलावाचा सांडवा फुटल्याने गावात भातशेती बरोबरच मोठया प्रमाणावर घरांचे नुकसान झाले होते. गावातील रस्ते, घरे, वीज वितरण व्यवस्था पुरती कोलमडली होती. महसूल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने साफसफाई करत रस्त्यावरील गाळ, चिखल हटविण्याचे काम युद्ध पातळीवर केले. या महापुरात आठ ते दहा विजेचे खांब कोसळले होते, वीज तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. या घटनेला दहा दिवस लोटले तरी वीज वितरण कंपनी मार्फत गावात अद्यापही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
गावाच्या आसपास दाट जंगल असल्याने श्वापदे, वन्यजीव यापासून नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे. वीज नसल्याने पीठाच्या गिरणी बंद आहेत त्यामुळे रोजच जेवणात भात शिजवावा लागत आहे. मोबाईल, बॅटरी, दूरदर्शन बंद असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उंबरठाण येथील फिडर वरुन निम्या गावात तात्पुरत्या स्वरुपात वीज जोडणी दिली असली तरी लोड असल्याने वारंवार वीज गायब होते. अलंगुण गावातीलच वडपाडा या
पाड्यावर अद्यापही वीजेचे खांब उभे करण्यात आलेले नाही अद्यापही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने या पाड्यावरील
आश्रम शाळेत निवासी विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही तसेच परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरल्याने सर्पदंश, विंचू दंश, वन्यजीव यांची भीती वाटत आहे. वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.