राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नंतर पुन्हा एक भाजपच्या केंद्रीय नेत्याने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावर आता महाराष्ट्रातील वातावरण तापले असून भाजप नेत्या विरोधात रान उठवले आहे. तसेच विरोधकांनी यावरून राज्यातील सरकारला देखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा तिखट समाचार घेतला असून “डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आलीय.” असा खणखणीत इशारा दिलाय.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह अवघ्या देशात वाद निर्माण झाला. याच्या विरोधात भाजपनेही राज्यभर आंदोलन केले. हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच आता राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सुधांशु त्रिवेदी यांच्या ‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
यावर आमदार रोहित पवार यांनी प्रखर टीका केली असून ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांवर आता भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आलीय.”
रोहित पवारांची ट्वीटरवर पोस्ट
